Unseasonal Rain : मराठवाड्यात पुन्हा एकदा आभाळ कोसळलं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभं असलेलं सोन्यासारखं पीक अक्षरश: मातीला मिळालं. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली रब्बी पिकं एका रात्रीत आडवी पडली. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड आणि परभणी या पाच जिल्ह्यांना जबर तडाखा दिला. शेतात उभा असलेला गहू, हरभरा, ज्वारी वाऱ्याच्या झोतासह पावसात लोळताना दिसला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. Unseasonal Rain
छत्रपती संभाजीनगर विभागात हवामानात अचानक झालेला बदल हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. या बदलामुळे मराठवाड्यावर ढगांची दाट चादर पसरली आणि पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळू लागल्या. Dharashiv district मध्ये सकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर उमरगा तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. आधीच काढणीस तयार असलेली पिकं भिजल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Latur district मध्ये परिस्थिती अधिक गंभीर दिसून आली. लातूर, रेणापूर आणि चाकूर तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाने हजेरी लावली. रेणापूर तालुक्यात दुपारी गारपीट झाली आणि काही गावांमध्ये वाऱ्याने घरांवरील पत्रे उडून गेल्याची नोंद झाली. गारांच्या माऱ्याने गव्हाचे कणसे तुटली, हरभऱ्याच्या शेंगा खाली पडल्या. शेतकरी हवालदिल झाले.
Parbhani district मध्ये सकाळी कडक ऊन होते, पण दुपारनंतर वातावरण अचानक पालटले. तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यानंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गंगाखेड, पालम तसेच आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, नाव्हलगाव या भागांना मोठा फटका बसला. काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Nanded district आणि Hingoli district मध्येही अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. काही ठिकाणी वीज कडकडाटासह पाऊस झाला. बीड जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काढणीच्या उंबरठ्यावर उभे असलेले पीक जर पुन्हा भिजले, तर त्याची गुणवत्ता घसरू शकते, बाजारभावावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या हवामान बदलाचा परिणाम केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित नाही. India Meteorological Department च्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील सुमारे दहा राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि तेलंगणा या राज्यांमध्येही वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.
मराठवाड्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांच्या फेऱ्यात सापडले आहेत. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि आता काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस या चक्रामुळे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची अपेक्षा आता पुन्हा एकदा पुढे येणार आहे. पण सध्या तरी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत पाऊस थांबेल का, की आणखी एक फटका बसणार? पुढील २४ तास मराठवाड्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.
हे पण वाचा : पावसाने उघडीप दिली, पण पंजाबराव डखांचा मोठा अंदाज या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात धुवांधार पाऊस!