Weather News : राज्यभर उन्हाचा कहर सुरू असून, दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत चालली आहे. सकाळी ९ वाजताच उन्हाचा तडाखा अंगाची लाही लाही करत आहे. उकाड्यामुळे लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. घराबाहेर पाऊल टाकणंही जड झालंय. मार्च-एप्रिल सरले तरी उकाड्याने काही मागे हटण्याची लक्षणं दिसत नाहीत. यामध्येच हवामान विभागाने आता पुण्यासह ८ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.Weather News
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत घराबाहेर जाणं टाळा, असं स्पष्ट सांगण्यात आलंय.
कोणते जिल्हे यलो अलर्टमध्ये?
पुणे, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर — हे जिल्हे सध्या उष्णतेच्या विळख्यात सापडले आहेत. या भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून काही भागांत ४२ ते ४४ अंशांच्या दरम्यान पारा पोहोचल्याचं निदर्शनास आलंय.
पुण्यात तापमान ४०.२ अंशांवर
पुणे शहरात सुद्धा उन्हाचा पारा सतत चढत असून आज ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. शहरात उष्णतेची तीव्रता वाढली असून थंड पेये, घरगुती सरबत, आंब्याची पन्हं, ताक यांना जोर आला आहे. नागरिक उन्हात फिरायला टाळाटाळ करत असून जिथं सावली मिळेल तिथं थांबण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मराठवाड्यात उष्णतेचा हाहाकार
छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४२ अंशांच्या पुढे गेलं आहे. आज तिथं ४२.६ अंश तापमान नोंदलं गेलं. परभणी ४३.४ अंशांवर, बीड ४२.१, लातूर आणि धाराशिव ४१ अंशांवर आहेत. रस्त्यांवर सन्नाटा दिसत असून नागरिक सावलीचा शोध घेत फिरत आहेत.
उत्तर महाराष्ट्रही तापलेला
उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार हे जिल्हे सुद्धा तापमानाच्या शिखरावर आहेत. इथं तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक नोंदवलं गेलं आहे. प्रचंड गरम वाऱ्यांमुळे उन्हाचे चटके अधिक जाणवत आहेत.
मुंबई-कोकणातही उकाड्याची लाट
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील परिसरात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक असून उकाड्याने त्रास वाढवलाय. सकाळीच घामाघूम होणं सुरू होतं आणि दुपारपर्यंत श्वास घेणंही कठीण होतंय.
पाच दिवसांचा पावसाचा अलर्ट… पण तापमान मात्र जैसे थे
हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पण जरी पावसाची शक्यता वर्तवली गेली असली तरी त्याचा तितका परिणाम तापमानावर होताना दिसत नाहीये. बहुतांश भागांत कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या दरम्यानच आहे.
निसर्गाचं चक्र बिघडतंय?
एप्रिल संपायला आला तरी तापमानात कोणतीही घट नाही, उलट उष्णतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. पावसाचा इशारा असला तरी त्याचा दिलासा मिळेल असं काही चित्र नाही. त्यामुळे हवामान विभागाचे अपडेट्स नियमितपणे पाहणं आणि आवश्यक ती खबरदारी घेणं हेच शहाणपणाचं ठरेल.
हे पण वाचा | राज्यातील या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पावसाचे अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज